हल्लेखोर मोकाटच ! व्यापारी दहशतीखाली
त्या व्यापाऱ्याची प्रकृती चिंताजनक !
उस्मानपुरा पोलीस स्टेशन जवळील प्रतापनगरात काल रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरील लुटारूंनी दोन तरुण व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला चढवला. पैसे लुटण्याच्या बहाण्याने केलेल्या या हल्ल्यातील एका व्यापाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे घटनेच्या १८ तासानंतरही पोलिसांना आरोपींचा शोध घेता आलेला नाही. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आणि रात्री साडेआठ वाजताच झालेल्या या घटनेने शहरात चोर, लुटारू दरोडेखोरांचा नंगानाच सुरू असल्याचे दिसून येते.
शहरात गुन्हेगार किती निर्ढावले आहेत याचा नमुना काल दिसून आला. जुन्या मोंढ्यातील किराणा व्यापारी अजित सुरेंद्र कोठारी (वय ३५) आणि अशोक सुरेंद्र कोठारी (वय ३८) हे दोघे बंधू दुकान बंद करून रात्री साडे आठच्या सुमारास घरी जात होते. उस्मानपुरऱ्यातील प्रताप नगर चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गाडी चालवणाऱ्या अजितवर लोखंडी रॉड ने हल्ला चढवला. या हल्ल्याने अजित आणि अशोक दोघेही दुचाकीवरून खाली कोसळले. त्यानंतरही हल्लेखोरांनी अशोक यांच्या डोक्यात प्रहार लोखंडी रॉडने पाच ते सात प्रहार केले. त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. अजितच्या डोक्यातही रॉड घातले. हा हल्ला इतका भयंकर होता की दोन्ही बंधू रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. इतक्यात पुन्हा एकजण दुचाकीवर आला त्यानेही दोघा भावांवर हल्ला चढवला. आरडाओरड ऐकून आजूबाजूला असलेले रिक्षाचालक तसेच काही नागरिक धावत आले. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले.
अशोक यांची प्रकृती चिंताजनक !
दरम्यान हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने डोक्यावरच हल्ला केल्याने अशोक कोठारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोक्याला ६० ते ७० टाके पडल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. तर अजित कोठारी यांच्या डोक्यालाही ३० ते ४० टाके पडले आहेत. दोघांवरही एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
व्यापार्यावर हल्ले नेहमीचेच !
शहरात लुटारूंची दहशत वाढत चालली आहे. पोलिसांचा धाक उरला नसल्याने ढवळ्या दिवसा लुटमारीचे प्रकार होत आहेत. गेल्या तीन-चार महिन्यात जुन्या मोढ्यातील अनेक किराणा दुकान फोडण्यात आली. लाखोंचा माल लंपास करण्यात आला. या चोरांना अजूनही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाही. व्यापार्यावर हल्ला करण्याचे प्रकार अनेकदा घडले. या सर्व घटनेतील आरोपी अजूनही मोकाटच आहेत. त्यातच काल रात्री पुन्हा कोठारी बंधूंवर हल्ला झाला. या प्रकाराने व्यापारी संघटना संतप्त झाली आहे. चोर, दरोडेखोर लुटारूवर पोलिसांचा धाकच उरला नसल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून उमटत आहे.
पोलीस आयुक्तांना भेटणार व्यापारी !
दरम्यान व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेणार आहे. शहरात वाढलेल्या लुटीच्या घटना चिंताजनक असून व्यापाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. हल्लेखोरांवर जरब बसण्यासाठी कठोर कारवाई करावी, व्यापाऱ्यांना संरक्षण द्यावे, मोंढा परिसरात पोलीस चौकी द्यावी, रात्रीची गस्त घालावी, आदी मागण्या करण्यात येणार आहेत.